Joshua 16 (IRVM)
1 योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते. 2 मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली. 3 पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता. 4 याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले. 5 एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती. 6 आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली. 7 नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली. 8 तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे. 9 आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती; 10 तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.