2 Samuel 2 (IRVM)
1 मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.” 2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया. 3 दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांसही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली. 4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, “याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले.” 5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. 6 आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. 7 आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.” 8 नेरचा मुलगा अबनेर हा शौलाचा सेनापती होता. इकडे तो शौलाचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला. 9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले. 10 हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करू लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता. 11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले. 12 नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले. 13 सरुवा हिचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली. 14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.” 15 तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले. 16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव “हेलकथहसूरीम” असे पडले हे स्थळ गिबोनामध्ये आहे. 17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला. 18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता. 19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवीडावीकडे वळून देखील पाहिले नाही. 20 अबनेरने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?” 21 असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला. 22 पुन्हा अबनेर त्यास म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.” 23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले. 24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे. 25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले. 26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्यास विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांस सांग.” 27 तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते. 28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलाशी युध्दही केले नाही. 29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केली. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते. 30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांस त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरून दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्यास आढळून आले. 31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती. 32 दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोहोचली.