Exodus 11 (IRVM)
1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील, 2 तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.” 3 मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता. 4 मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन 5 आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील. 6 मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल. 7 परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल. 8 मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला. 9 परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.” 10 आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांस बाहेर जाऊ दिले नाही.