2 Chronicles 24 (IRVM)
1 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती. 2 यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. 3 यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली. 4 पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले. 5 तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही. 6 तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवीना तू यहूदा आणि यरूशलेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे.” 7 पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी परमेश्वराच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बआल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती. 8 राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. 9 लेवींनी मग यहूदा व यरूशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांस सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता. 10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले. 11 पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. 12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले. 13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले. 14 कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याव्यतिरिक्त सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जिवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत. 15 पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युवेळी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते. 16 दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे याठिकाणी दफन केले. 17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले. 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला. 19 लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात. 20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, “तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे.” 21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले. 22 जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.” 23 वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरूशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले. 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले. 25 अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही. 26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती. 27 योवाशाचे पुत्र, त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.
In Other Versions
2 Chronicles 24 in the ANTPNG2D
2 Chronicles 24 in the BNTABOOT
2 Chronicles 24 in the BOATCB2
2 Chronicles 24 in the BOGWICC
2 Chronicles 24 in the BOHNTLTAL
2 Chronicles 24 in the BOILNTAP
2 Chronicles 24 in the BOKHWOG
2 Chronicles 24 in the KBT1ETNIK
2 Chronicles 24 in the TBIAOTANT