Deuteronomy 28 (IRVM)
1 आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. 2 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील: 3 तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. 4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील. 5 तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील. 6 तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल. 7 तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल. 8 परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल. 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हास आपली पवित्र प्रजा करून घेईल. 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल. 11 परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हास भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. 12 आपले आशीर्वादाचे भांडार परमेश्वर तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हास कर्ज काढावे लागणार नाही. 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा. 14 या शिकवणीपासून परावृत्त होऊ नका. उजवीडावीकडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका. 15 पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील: 16 नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल. 17 तुमच्या टोपल्या आणि पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील. 18 परमेश्वराच्या शापाने तुम्हास फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील. 19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हास शाप देईल. 20 तुम्ही दुष्कृत्ये करून परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात शाप येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलीत होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल. 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील. 22 परमेश्वर तुम्हास रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील. 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल. 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल. 25 तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील. 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही. 27 परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांस गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हास करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हास शासन करील. 28 परमेश्वर तुम्हास वेडेपणा, अंधत्व, भांबावलेपण यांनी ग्रस्त करील. 29 तुम्ही भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हास एकसारखे नागवतील, दुखावतील आणि तुम्हास कोणी त्राता राहणार नाही. 30 तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यामध्ये राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हास मिळणार नाही. 31 लोक तुमच्यासमोर तुमचा बैल कापतील पण त्याचे मांस तुम्हास खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्यामेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हास कोणी सोडवणारा असणार नाही. 32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही. 33 तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील. 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल. 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी व बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हास शासन करील. 36 तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठपाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल. 37 आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हास नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल. 38 तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील. 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यामध्ये खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षरस तुम्हास मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील. 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हास मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील. 41 तुम्हास मुले आणि मुली होतील पण ती तुम्हास लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल. 42 तुमच्या भूमीचे, तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे टोळधाडीने नुकसान होईल. 43 तुमच्या गावात राहणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल. 44 ते तुम्हास कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून रहाल. 45 तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील. 46 हे शाप तुमच्यावर व तुमच्या सतंतीवर कायमचे चिन्ह व आश्चर्य असे होतील. 47 सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून 48 परमेश्वराने पाठवलेल्या शत्रूसमोर तुम्हास नतमस्तक व्हावे लागेल. आणि तुम्ही त्यांची सेवा तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे होऊन कराल. परमेश्वर तुमच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवील. ते तुम्हास बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हास वागवावे लागेल. 49 दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षरस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हास उरणार नाही. 52 ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल. 53 तुम्हास फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल. 54 तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत. 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही, अगदी आपल्या घरातल्यांनाही वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल. 56 तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक स्त्रीसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल. 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूति वेळी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील. 58 या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि भययोग्य तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल. 60 अशा रोगराईला आणि उपद्रवांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हास धास्ती वाटत असे. त्या सगळ्यांतून तुम्हास पुन्हा जावे लागेल. 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील. 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक रहाल. 63 तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वरास आनंद वाटत होता तसाच आनंद त्यास तुमचा नाश करायला आणि तुम्हास रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हास हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हास पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल. 65 या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हास शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल. 66 तुम्हास नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले रहाल. तुम्हास जिवाची काही खात्री वाटणार नाही. 67 सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. 68 परमेश्वर तुम्हास जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हास पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हास विकत घेणार नाही.
In Other Versions
Deuteronomy 28 in the ANTPNG2D
Deuteronomy 28 in the BNTABOOT
Deuteronomy 28 in the BOHNTLTAL
Deuteronomy 28 in the BOILNTAP
Deuteronomy 28 in the KBT1ETNIK
Deuteronomy 28 in the TBIAOTANT