Deuteronomy 9 (IRVM)
1 हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदीपलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तीशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे. 2 तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हास माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याविषयी आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे. 3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे. 4 तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे. 5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे. 6 म्हणून तुम्ही हे निश्चित लक्षात ठेवा की, तुमच्या चांगूलपणामुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हास वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात. 7 रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करीत आलेले आहात. 8 होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता. 9 त्याचे असे झाले; परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो. 10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले 11 चाळीस दिवस, चाळीस रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या. 12 परमेश्वर म्हणाला, “ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून बहकले आहेत. त्यांनी स्वत: साठी एक ओतीव मूर्ती केली आहे.” 13 परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी या लोकांस पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत. 14 मला आडवू नकोस, त्यांचा नाश करु दे. मी त्यांचे नाव आकाशाखालून खोडून टाकीन. मग मी तुझे, त्यांच्याहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.” 15 मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या. 16 मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरूद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ती केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता! 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या. 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात. 19 परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. 20 परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. 21 मग तुमचे ते अमंगळ कृत्य, तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले. 22 नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वरास संतप्त केलेत. 23 जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हास रवाना करून सांगितले की, “जा, व जो देश मी तुम्हास दिला आहे तो ताब्यात घ्या,” तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही. 24 जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे. 25 तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता. 26 मी परमेश्वरास विनवणी केली की हे प्रभू तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करून बाहेर आणले आहेस. 27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर. 28 तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले. 29 पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहेत, तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.
In Other Versions
Deuteronomy 9 in the BOHNTLTAL
Deuteronomy 9 in the KBT1ETNIK
Deuteronomy 9 in the TBIAOTANT