Job 1 (IRVM)
1 ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही. 2 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. 3 ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता. 4 प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. 5 जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे. 6 एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला. 7 परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.” 8 परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीत त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दूर राहणारा असा कोणीही मनुष्य नाही.” 9 नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय? 10 तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे. 11 पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करील.” 12 परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला. 13 एक दिवस असा आला की, जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षरस पीत होते. 14 तेव्हा एक निरोप्या ईयोबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि त्यांच्याबाजुस गाढवी चरत होत्या, 15 शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.” 16 पहिला हे सांगत असतांनाच दुसरा आला आणि म्हणाला, “आकाशातून दैवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले, आणि मीच तेवढा बचावून तुला सांगायला आलो आहे.” 17 तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.” 18 आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते. 19 तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.” 20 तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. 21 तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.” 22 या सर्व स्थितीतही, ईयोबाकडून पाप घडले नाही, देवाने चूक केली आहे असे काही तो मुर्खासारखा बोलला नाही.