1 Corinthians 15 (IRVM)
1 आता बंधूंनो मी तुम्हास आठवण करून देतो, की जे शुभवर्तमान मी तुम्हास गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिरही आहात. 2 ज्याच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले आहे तेच शुभवर्तमान मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हासही शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. 3 कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला. 4 त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले. 5 व तो केफाला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, 6 नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत. 7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. 8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे, त्या मलासुद्धा तो दिसला. 9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावयाच्या योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. 10 पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. 11 म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. 12 पण जर आम्ही ख्रिस्त मरण पावलेल्यातून उठविला गेला आहे असे शुभवर्तमान गाजवतो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे? 13 जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, 14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. 15 आणि आम्ही देवाचे खोटे साक्षी ठरलो कारण देवाने ख्रिस्ताला उठवले अशी आम्ही त्याच्याविषयी साक्ष दिली. जर हे असे असेल की, मरण पावलेले उठवले जात नाहीत तर त्याने त्यास उठवले नाही. 16 आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. 17 आणि, जर ख्रिस्त उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापात आहात. 18 होय आणि जे ख्रिस्तात मरण पावलेले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. 19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत. 20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील. 24 मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल. 25 कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. 26 जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल. 27 पवित्र शास्त्र सांगते, “कारण देवाने, त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी अंकित केल्या आहेत.” पण जेव्हा तो म्हणतो की, “सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत,” तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या, तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे. 28 आणि, जेव्हा सर्व गोष्टी त्यास वश होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या वश करणार्याला वश होईल. म्हणजे देवपिता हाच सर्वात सर्व असावा. 29 नाही तर, जे लोक मरण पावल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात? 30 आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो? 31 बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो. 32 मनुष्य स्वभावाप्रमाणे इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मरण पावलेले उठवले जात नाहीत तर चला “आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे!” 33 फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.” 34 नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. 35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मरण पावलेले कसे उठवले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” 36 तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही. 37 आणि तू जे पेरतोस ते त्याचे भावी शरीर पेरीत नाहीस, तर उघडा दाणा पेरतोस; तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल. 38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्यास आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो. 39 जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते. 40 तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर पृथ्वीवरील शरीराचे दुसरे असते. 41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो. 42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. 43 जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. 46 परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. 47 पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49 आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. 50 आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. 51 पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. 52 क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. 53 कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. 54 हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा,पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे;“विजयात मरण गिळले गेले आहे.” 55 “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे?मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” 56 मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. 57 पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो! 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
In Other Versions
1 Corinthians 15 in the ANGEFD
1 Corinthians 15 in the ANTPNG2D
1 Corinthians 15 in the BNTABOOT
1 Corinthians 15 in the BOATCB
1 Corinthians 15 in the BOATCB2
1 Corinthians 15 in the BOGWICC
1 Corinthians 15 in the BOHLNT
1 Corinthians 15 in the BOHNTLTAL
1 Corinthians 15 in the BOILNTAP
1 Corinthians 15 in the BOITCV
1 Corinthians 15 in the BOKCV2
1 Corinthians 15 in the BOKHWOG
1 Corinthians 15 in the BOKSSV
1 Corinthians 15 in the BOLCB2
1 Corinthians 15 in the BONUT2
1 Corinthians 15 in the BOPLNT
1 Corinthians 15 in the BOTLNT
1 Corinthians 15 in the KBT1ETNIK
1 Corinthians 15 in the SBIBS2
1 Corinthians 15 in the SBIIS2
1 Corinthians 15 in the SBIIS3
1 Corinthians 15 in the SBIKS2
1 Corinthians 15 in the SBITS2
1 Corinthians 15 in the SBITS3
1 Corinthians 15 in the SBITS4
1 Corinthians 15 in the TBIAOTANT
1 Corinthians 15 in the TBT1E2