2 Chronicles 18 (IRVM)
1 यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला. 2 त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले. 3 अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.” 4 यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.” 5 तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.” 6 पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.” 7 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.” 8 तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.” 9 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते. 10 कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’” 11 इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.” 12 मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.” 13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.” 14 मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.” 15 राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!” 16 यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.” 17 इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.” 18 मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.” 19 परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने, 20 “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?” 21 तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.” 22 “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.” 23 तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?” 24 मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.” 25 इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा 26 आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.” 27 मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.” 28 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादावर हल्ला चढवला. 29 इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले. 30 अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.” 31 त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले. 32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला. 33 पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.” 34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.
In Other Versions
2 Chronicles 18 in the ANTPNG2D
2 Chronicles 18 in the BNTABOOT
2 Chronicles 18 in the BOATCB2
2 Chronicles 18 in the BOGWICC
2 Chronicles 18 in the BOHNTLTAL
2 Chronicles 18 in the BOILNTAP
2 Chronicles 18 in the BOKHWOG
2 Chronicles 18 in the KBT1ETNIK
2 Chronicles 18 in the TBIAOTANT