Deuteronomy 24 (IRVM)
1 एखाद्याला लग्नानंतर आपल्या पत्नीच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली व ती त्यास आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा; मग तिला घराबाहेर काढावे. 2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा. 3 त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. 4 कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे या गोष्टीचा तुमचा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका. 5 एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्यास सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्यास द्यावी. 6 कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये, नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल. 7 कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या मनुष्यास ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे. 8 कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील ते ऐका. 9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या. 10 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका. 11 बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले कपडे आणील. तर ते वस्त्र अंगावर घेऊन झोपू नका. 13 त्यास रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्यास पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हास आशीर्वाद देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय. 14 तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. 15 त्यास रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल. 16 मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आई-वडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्यास मिळावी. 17 गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हास सांगत आहे. 19 शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्याच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हास तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 20 जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नको. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे. 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे. 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हास हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.
In Other Versions
Deuteronomy 24 in the ANTPNG2D
Deuteronomy 24 in the BNTABOOT
Deuteronomy 24 in the BOHNTLTAL
Deuteronomy 24 in the BOILNTAP
Deuteronomy 24 in the KBT1ETNIK
Deuteronomy 24 in the TBIAOTANT