Deuteronomy 25 (IRVM)
1 लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करावा. निर्दोष्याला निर्दोष ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे. 2 दोषी व्यक्ती फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. 3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल. 4 धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका. 5 दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे. 6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये. 7 त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.” 8 अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांस बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल 9 तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, “जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.” 10 जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल. 11 दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले, 12 तर दयामाया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा. 13 बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत. 14 आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत. 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल. 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला वीट आहे. 17 तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा. 18 त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्हास शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हास विश्राम दिल्यावर हे अंमलात आणा. विसरू नका.
In Other Versions
Deuteronomy 25 in the ANTPNG2D
Deuteronomy 25 in the BNTABOOT
Deuteronomy 25 in the BOHNTLTAL
Deuteronomy 25 in the BOILNTAP
Deuteronomy 25 in the KBT1ETNIK
Deuteronomy 25 in the TBIAOTANT