1 Chronicles 29 (IRVM)
1 राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. 2 माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे. 3 आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे. 4 तीन हजार किक्कार ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत. 5 कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?” 6 तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या. 7 देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार सोने, दहा हजार किक्कार रुपे, अठरा हजार किक्कार पितळ, आणि एक लाख किक्कार लोखंड दिले. 8 ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली. 9 या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही फार आनंदीत झाला. 10 त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.” 11 हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस. 12 संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे. 13 देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. 14 या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत. 15 आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही. 16 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे. 17 हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे. 18 हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर. 19 माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. 20 तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले. 21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले. 22 मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला. 23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत. 24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले. 25 परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले. 26 इशायाचा पुत्र दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले. 27 दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरूशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहतीस वर्षांची होती. 28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला. 29 राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेला आहे. 30 त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.
In Other Versions
1 Chronicles 29 in the ANTPNG2D
1 Chronicles 29 in the BNTABOOT
1 Chronicles 29 in the BOATCB2
1 Chronicles 29 in the BOGWICC
1 Chronicles 29 in the BOHNTLTAL
1 Chronicles 29 in the BOILNTAP
1 Chronicles 29 in the BOKHWOG
1 Chronicles 29 in the KBT1ETNIK
1 Chronicles 29 in the TBIAOTANT