Deuteronomy 11 (IRVM)
1 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा. 2 परमेश्वराने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हासच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी या शिस्तींपैकी काहीच पाहिले किंव्हा अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे, 3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे. 4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले. 5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हास त्याने कसे आणले हे तुम्हास माहीत आहेच. 6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले. 7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत. 8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल. 9 त्या देशात तुम्ही चिरकाल रहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना दुधामधाचा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे. 10 तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता. 11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देशामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते. 12 तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते. 13 परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हास देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा. 14 तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल. 15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल. 16 पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका. 17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हास देत आहे त्यामध्ये तुम्हास लवकरच मरण येईल. 18 म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा. 19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. 20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. 21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल. 22 मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा. 23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल. 24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल. 25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल. 26 आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा. 27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल. 28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वरास तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हास ओळख नाही. 29 तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा. 30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत. 31 तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा 32 मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.
In Other Versions
Deuteronomy 11 in the ANTPNG2D
Deuteronomy 11 in the BNTABOOT
Deuteronomy 11 in the BOHNTLTAL
Deuteronomy 11 in the BOILNTAP
Deuteronomy 11 in the KBT1ETNIK
Deuteronomy 11 in the TBIAOTANT