Deuteronomy 23 (IRVM)
1 जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे. 2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे. 3 अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये. 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले. 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती. 6 तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका. 7 अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरी लोकांचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. 8 त्यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांस इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही. 9 युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. 10 एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये त्याने छावणीच्या आत येवू नये. 11 मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे. 12 प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी. 13 आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हास सोडून जायचा. 15 एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्यास मालकाच्या स्वाधीन करु नका. 16 त्यास आपल्या निवडीनुसार त्यास तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्यास जाच करु नका. 17 इस्राएलाच्या स्त्रीयांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्राएली पुत्रापैकी कोणासही पुमैथुनास वाहू नये. 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वरास अशा व्यक्तीचा विट आहे. 19 आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका. 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 21 तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल. 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हास काही नवस बोला असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा. 24 दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. 25 आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका.
In Other Versions
Deuteronomy 23 in the ANTPNG2D
Deuteronomy 23 in the BNTABOOT
Deuteronomy 23 in the BOHNTLTAL
Deuteronomy 23 in the BOILNTAP
Deuteronomy 23 in the KBT1ETNIK
Deuteronomy 23 in the TBIAOTANT