Revelation 8 (IRVM)
1 जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. 2 नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. 3 दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. 4 देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. 5 तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला. 6 ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. 7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. 8 दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. 9 समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला. 10 तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; 11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. 12 चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. 13 आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!