1 Chronicles 16 (IRVM)
1 त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली. 2 मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला. 3 मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली. 4 मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले. 5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत. 6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत. 7 तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले. 8 परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा.राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा. 9 त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा.त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला. 10 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो. 11 परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा.निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा. 12 त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा.त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. 13 त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो,त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो, 14 तो परमेश्वर, आमचा देव आहे.त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. 15 त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा.त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा. 16 त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली. 17 याकोबासाठी त्याने तोच नियम केला.आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला. 18 तो म्हणाला, “मी तुला कनान देशतुमच्या वतनाचा वाटा असा देईन.” 19 मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. 20 तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता.एका राज्यातून दुसऱ्यात जात होता. 21 पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही.त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. 22 तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका.माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” 23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा.त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा. 24 त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवासर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा. 25 परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे.आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे. 26 कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत.पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. 27 महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत.सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. 28 अहो लोकांच्या कुळांनोपरमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. 29 परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या.त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. 30 त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतोपण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. 31 पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो;राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.” 32 समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करोशेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत. 33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातीलकारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. 34 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. 35 आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावीआणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.” 36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो.सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. 37 मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले. 38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते. 39 सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले. 40 ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते. 41 आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. 42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते. 43 नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.
In Other Versions
1 Chronicles 16 in the ANTPNG2D
1 Chronicles 16 in the BNTABOOT
1 Chronicles 16 in the BOATCB2
1 Chronicles 16 in the BOGWICC
1 Chronicles 16 in the BOHNTLTAL
1 Chronicles 16 in the BOILNTAP
1 Chronicles 16 in the BOKHWOG
1 Chronicles 16 in the KBT1ETNIK
1 Chronicles 16 in the TBIAOTANT