Acts 7 (IRVM)
1 महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?” 2 तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्यास दर्शन दिले.” 3 व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा. 4 तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. 5 पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही. त्यास मूलबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल. 6 देवाने आणखी असे सांगितले त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील, आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील. 7 ‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले. 8 त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले. 9 नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. 10 त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. 11 मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. 12 तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. 13 मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. 14 तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले. 15 ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले. 16 त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले. 17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. 18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. 19 हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. 20 त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले. 21 मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले. 22 मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता. 23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. 24 तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला: 25 तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. 26 मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’ 27 तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? 28 काल तू मिसऱ्याला ठार मारले, तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ 29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले. 30 मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. 31 मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की, 32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही. 33 कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. 34 मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ 35 तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. 36 मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले. 37 तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ 38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. 39 त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून. 40 ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’ 41 मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. 42 तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय? 43 मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’ 44 तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. 45 जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. 46 दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली. 47 आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले. 48 तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे. 49 प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? 50 माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’ 51 अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. 52 ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. 53 अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” 54 त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. 55 परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. 56 आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” 57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; 58 मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली. 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” 60 मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.