John 6 (IRVM)
1 या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात. 2 तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती. 3 येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. 4 आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता. 5 तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” 6 हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. 7 फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.” 8 त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, 9 “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?” 10 येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. 11 येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. 12 ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.” 13 मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. 14 तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.” 15 मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. 16 संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले; 17 आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता. 18 आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते. 19 मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. 20 पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” 21 म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले. 22 दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. 23 तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरी लहान तारवे आले होते. 24 तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधीत ते कफर्णहूमला आले. 25 आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?” 26 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” 28 तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?” 29 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” 30 म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? 31 आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ 32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. 33 कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” 34 तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.” 35 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. 36 परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. 37 पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. 38 कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. 40 माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.” 41 “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. 42 तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?” 43 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. 44 ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. 45 संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. 46 जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही. 47 मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 48 मीच जीवनाची भाकर आहे. 49 तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले. 50 पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” 52 तेव्हा यहूद्यांनी आपआपल्यात वाद वाढवून म्हटले, “हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल?” 53 यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. 54 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. 55 कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. 56 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. 57 जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल. 58 स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” 59 कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या. 60 त्याच्या शिष्यांतील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, “हे वचन कठीण आहे; हे कोण ऐकून घेऊ शकतो?” 61 आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? 62 मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर? 63 आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. 64 तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत” कारण कोण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला कोण धरून देईल, हे येशू पहिल्यापासून जाणत होता. 65 तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हास म्हणले की, कोणीही मनुष्य, त्यास पित्याने ते दिल्याशिवाय, तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” 66 त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. 67 तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, “तुमची पण जायची इच्छा आहे काय?” 68 तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. 69 आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की, आपण देवाचे पवित्र पुरूष आपण आहात.” 70 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एकजण सैतान आहे.” 71 हे त्याने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्याविषयी म्हणले होते; कारण बारा जणांतला तो एक असून त्यास धरून देणार होता.