Lamentations 3 (IRVM)
1 तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली. 2 त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले. 3 खचितच तो माझ्याविरूद्ध झाला आहे; पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे. 4 त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत 5 त्याने माझ्याविरूद्ध विष व दुःखाचे बांधकाम करून मला वेढले आहे. 6 फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे. 7 त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही.त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत. 8 मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो. 9 त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे.त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे. 10 तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे. 11 त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे. 12 त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे. 13 त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत. 14 माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे. 15 त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे. 16 त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे. 17 माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही. 18 मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.” 19 माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर. 20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. 21 पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. 22 ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. 23 ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. 24 माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” 25 जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे. 26 परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे. 27 पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे. 28 ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे. 29 त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल. 30 एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे; 31 कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही. 32 जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील. 33 कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही. 34 पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे, 35 परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे, 36 एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय? 37 परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का? 38 इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय? 39 कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी? 40 चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू. 41 आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया. 42 आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस. 43 तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस. 44 कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस. 45 लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस. 46 आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे. 47 भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे. 48 माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत. 49 माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही; 50 परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही. 51 माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात. 52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे. 53 गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे. 54 माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.” 55 परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला. 56 तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. 57 मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.” 58 परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास. 59 परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे. 60 माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास. 61 त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस. 62 माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे. 63 परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे. 64 परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर. 65 तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील. 66 क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.
In Other Versions
Lamentations 3 in the ANTPNG2D
Lamentations 3 in the BNTABOOT
Lamentations 3 in the BOHNTLTAL
Lamentations 3 in the BOILNTAP
Lamentations 3 in the KBT1ETNIK
Lamentations 3 in the TBIAOTANT