Isaiah 51 (IRVM)
1 “जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझे ऐका!ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे, आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहावे. 2 अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता.मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.” 3 होय, परमेश्वर सियोनेचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील.तो त्याचे रान एदेनाच्या बागेसारखे आणि त्याचे वाळवंट तो यार्देन नदीच्या जवळ, परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे.आनंद व हर्ष, आभारप्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील. 4 “माझ्या लोकांनो, माझ्या कडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो माझ्या कडे आपला कान लावा,कारण नियम माझ्यापासूनच निघेल, आणि मी माझे न्यायीपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन. 5 मी न्यायीपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्यायनिवाडा करतील.द्वीपे माझी वाट पाहतील, आणि माझ्या बाहूंवर भरवसा ठेवतील. 6 तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा.धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील,परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही. 7 ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका!मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका. 8 कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल,पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.” 9 परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो.ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय? 10 समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. ज्याने मोठ्या डोहातील पाणी सुकवले आणि समुद्रातील अति सखोल भागाचा रस्ता केला, ह्यासाठी की खंडणी भरून सोडवलेले पार होतील, तो तूच नाही काय? 11 परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतीलआणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील. 12 “मी, मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो, मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे? जे मृत्यू पावणारी आहेत, मनुष्यांचे मुले, गवतासारखा केली गेली आहेत.” 13 ज्याने स्वर्गे पसरवली, ज्याने पृथ्वीचा पाया घातला,तो परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, त्यास तू का विसरतेस?पीडक जणू काय नाश करायला सिद्ध आहे,म्हणून तू प्रत्येक दिवशी सारखी हताश असते,परंतू पीडणाऱ्याचा क्रोध कोठे आहे? 14 जो खाली वाकलेला आहे, परमेश्वर त्यास सोडण्यास त्वरा करेल, तो मरून खाचेंत पाडला जाणार नाही, आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही. 15 “कारण मी, परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात.” सेनाधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे. 16 मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे.अशासाठी की, मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा, आणि तू माझी प्रजा आहे, असे सियोनेला म्हणावे. 17 ऊठ, ऊठ, यरूशलेमे, जागी हो.तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे.तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे. 18 ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तिला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही,आणि ज्या मुलांना तिने वाढवीले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही. 19 ही दोन संकटे तुझ्यावर आली, तुझ्याबरोबर कोण दु:ख करणार?उजाडी व नाश आणि दुष्काळ व तलवार, कोण तुझे सांत्वन करणार? 20 तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय.परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत. 21 पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही, 22 तुझा देव, प्रभू परमेश्वर, जो आपल्या कैवार घेतो, तो असे म्हणतो,मी थरकापाचा प्याला, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे. तो तू पुन्हा पिणार नाहीस, 23 आता आम्ही तुझ्यावरून चालावे म्हणून आडवा पड, असे जे तुझे पीडणारे तुझ्या जीवाला म्हणाले आहेत,त्यांच्या हाती मी तो ठेवीन,आणि चालणाऱ्यांसाठी तू आपले शरीर भूमीप्रमाणे, रस्त्याप्रमाणे टाकून ठेवले आहे.